फोटो सौजन्य सोशल मीडिया
गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. घटनेनंतर घरातील रक्ताचे डाग आणि अन्य पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिस तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी आई-वडील आणि कुटुंबीयांसोबत गोडोली परिसरात राहत होती. तिच्या वर्तनावरून गेल्या काही दिवसांपासून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून घरात वाद सुरू झाला.
त्यानंतर मोबाईलच्या वापरावरूनही वाद वाढला. याचदरम्यान परिस्थिती चिघळली आणि मुलीच्या हातातील लाकडी बॅट वडिलांनी हिसकावून घेत तिच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
बॅटचा प्रहार झाल्यानंतर मुलगी घरातच कोसळली. मात्र, घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली नाही. रविवारी सकाळी मुलगी घरात बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान मुलगी पडलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कुटुंबीयांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला बोलावून घराची बारकाईने तपासणी करण्यात आली.
या प्रकरणात पुरुषोत्तम संपत कदम यांची आणि त्यांच्या पत्नीची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. दिवसभराच्या चौकशीनंतर वडिलांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपलब्ध माहितीनुसार, पुरुषोत्तम कदम हे शिक्षक असून त्यांची पत्नी शीला कदम यादेखील शिक्षिका आहेत.
ते मूळचे चंचळी, तालुका कोरेगाव येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेनंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न का झाला आणि मुलीचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






