
Shambhuraj Desai reaction Satara District Central Cooperative Bank election politics
मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या संघर्षातून निर्माण झालेल्या राजकीय जखमांबाबत विचारले असता देसाई यांनी दिलेले उत्तर अधिकच बोलके ठरले. “काही जखमा लवकर बऱ्या होत नसतात. त्यासाठी जालीम उपाय करावा लागतो,” असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात भाजपला अपेक्षित स्थान न मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्रितपणे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची समीकरणे जुळविल्याने भाजपसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
देसाई यांच्या ‘जालीम उपायां’च्या विधानाचा नेमका रोख कोणाकडे, याबाबत त्यांनी स्पष्ट भाष्य केले नसले, तरी आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीतील वरकरणी एकजूट आणि पडद्यामागील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.