जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक
मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी संपर्क, मतदान प्रक्रियेतील समन्वय तसेच महायुतीच्या संघटनात्मक बळकटीसंदर्भात बैठकीत विचारविनिमय झाल्याचे समजते.
महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांत व्यापक संपर्क मोहीम राबविली आहे. खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे तसेच सुनील तात्या काटकर यांनी विविध स्तरांवर मतदारांशी संवाद साधून महायुतीची भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील समन्वय हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे सक्रिय भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जलमंदिर येथे झालेली ही बैठक निवडणुकीपूर्वीच्या महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक मानली जात असून, मतदानाच्या दिवशी मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच आणि संघटनात्मक व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आल्याची चर्चा आहे. आता उद्याच्या मतदानानंतर येणाऱ्या निकालाकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Satara News : बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन! स्वराज क्रांती संघटनेचा इशारा






