बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे. या कृषी ग्राहकांना यापूर्वी आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात असे. रात्रीच्या वेळी शेतीपंप चालविण्यामुळे शेतकऱ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन, दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून सोलापूर मंडळात ९८४ एकर जमिनीवर २४३ मेगावॅट क्षमतेचे ४३ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ५० हजार ३६० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. सातारा मंडळात ८६१ एकर जमिनीवर १७५ मेगावॅट क्षमतेचे ४२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. बारामती ग्रामीण मंडळात ५५५ एकर जमिनीवर १११ मेगावॅट क्षमतेचे २२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होते. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. विकेंद्रित सौर प्रकल्पांमुळे वीज निर्मिती आणि वापर यांच्यातील अंतर कमी करण्यासही हातभार लागतो. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि हरित ऊर्जेचा विस्तार ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही केवळ सौर ऊर्जा निर्मितीची योजना नसून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊन त्यांच्या जीवनात सुरक्षितता, सुविधा आणि आर्थिक स्थैर्य आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
कुसुम ब, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून शाश्वत पाण्याचा स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ अश्वशक्तीचे पंप केवळ ५ ते १० टक्के लाभार्थाी हिस्सा भरून केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत बारामती परिमंडळात ५८ हजार ६८४ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. त्यात सोलापूर मंडळात ३८ हजार ६० , सातारा मंडळात ७ हजार ५९६, बारामती ग्रामीण मंडळात १३ हजार २८ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.



