Pune News : ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; घरात विजेचे कनेक्शन नसताना काढलं संपूर्ण आयुष्य
पुणे : ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय 85) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख होती. निसर्गाशी एकरून होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. मध्यवर्ती पुण्यात, बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले.
हेमा साने यांचा जन्म 13 मार्च 1940 रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एस्सी. पीएच.डी. संपादन केली. भारतीयविद्या शास्त्रातल्या एम.ए., एम.फिलपर्यंत शिक्षण घेतले. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या राहत होत्या. वाड्यात माझ्याबरोबर चार मांजरे, एक मुंगूस, एका घुबडासह काही पक्षी राहतात आणि हेच माझं कुटुंब आहे, असं त्या सांगत. त्यांच्या घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे नव्हती.
नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. वाड्यातील विहिरीतील पाण्याचाच त्या वापर करत होत्या. त्यांनी दूरध्वनी वापरला नाही. दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली. अलीकडील काही वर्षे त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरत होत्या. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
हेदेखील वाचा : महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार