महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार
मेढा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून तापोळा ओळखला जातो. वर्षभरात लाखो पर्यटक तापोळा पर्यटन केंद्रास भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत असतात. महाबळेश्वर ते तापोळा हे अंतर 26 किमी आहे. या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच डांबरीकरण करत संपूर्ण रस्ता चकाचक बनवला आहे. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात आता मिनी काश्मीर तापोळ्याला महाबळेश्वरवरून पर्यटकांना पोहोचता येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून तापोळा पर्यटन केंद्राकडे जाणाऱ्या या मार्गासाठी 93 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून या रस्त्याचे संपूर्ण काम दर्जेदार करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हा रस्ता मजबूत व दर्जेदार बनवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास आता सुखकर बनला आहे. त्याचबरोबर तापोळा या ठिकाणी केबल स्टे पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी खेड अंतर कमी होणार आहे.
दरम्यान, कोकणला हा मार्ग जोडला जाणारा आहे. दरे, पिंपरी, निवळी, मुरणी, शिंदी व पुढे खेडला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणाकडील पर्यटक अधिक प्रमाणामध्ये महाबळेश्वरपर्यंत येण्यास मदत होणार आहे.
वरळी सीलिंगच्या धर्तीवर तापोळा केबल स्टे पुलाची निर्मिती
मुंबई येथे वरळी सीलिंग ज्या पद्धतीने उभा करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर शिवसागर जलाशयावर तापोळा या ठिकाणी केबल पुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, या पुलाला गॅलरी देखील ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या गॅलरीतून तापोळा विभागातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाठपुरावा
गेल्या अनेक वर्षांपासून रघुवीर घाटामार्गे रस्ता व्हावा, अशी मागणी या विभागातील नागरिकांची होती. या विभागाचे सुपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या रस्त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल आहिरे, महाबळेश्वर उप अभियंता अजय देशपांडे यांनी या रस्त्याच्या मंजुरीसाठी वन विभाग, राष्ट्रीय वन्यजीव विभागाकडे पाठपुरावा करत या रस्त्याच्या मंजुऱ्या मिळवण्यासाठी विशेष कष्ट घेऊन हा रस्ता आता शिंदी वलवनपर्यंत जाणार आहे.