बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध ब्रिटनची मोठी कारवाई, नवीन करारानुसार फ्रान्समधून हद्दपार होणारा भारतीय नागरिक ठरला पहिला व्यक्ती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ब्रिटनने नवीन कराराअंतर्गत एका भारतीय नागरिकाला फ्रान्सला हद्दपार केले.
इंग्लिश खाडी लहान बोटीतून ओलांडणारा हा भारतीय नागरिक “वन-इन, वन-आउट” धोरणाअंतर्गत पहिला ठरला.
ब्रिटन सरकारने याला बेकायदेशीर स्थलांतराविरुद्धच्या कठोर मोहिमेतील “पहिलं महत्त्वाचं पाऊल” म्हटलं.
UK-France agreement : ब्रिटनमधील बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. इंग्लिश खाडीतील लहान बोटींमधून हजारो लोक दरवर्षी ब्रिटनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. सरकारने अनेकदा कडक कायदे केले तरी मानवी तस्करीचं हे जाळं अजूनही पूर्णपणे थांबलेलं नाही. अशा परिस्थितीत नुकताच घडलेला एक प्रकार जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे. ब्रिटनने एका भारतीय नागरिकाला फ्रान्सला हद्दपार करून नवीन “यूके-फ्रान्स रिटर्न कराराची अंमलबजावणी केली आहे. इंग्लिश खाडी लहान बोटीतून पार करून ब्रिटनमध्ये पोहोचणारा हा भारतीय नागरिक हद्दपारीसाठी पहिला ठरला आहे. या घटनेला “वन-इन, वन-आउट” धोरणांतर्गत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला हा भारतीय नागरिक फ्रान्सहून इंग्लिश खाडी लहान बोटीतून ओलांडून ब्रिटनमध्ये पोहोचला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याच्या बेकायदेशीर प्रवेशाचा खुलासा झाला आणि “यूके-फ्रान्स करार” अंतर्गत त्याला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर हीथ्रो विमानतळावरून त्याला पॅरिसकडे रवाना करण्यात आलं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin : कोण सांभाळणार रशियन साम्राज्याची कमान? व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केली पुढील उत्तराधिकारी पदासाठीची योजना
ब्रिटनच्या नव्या गृहसचिव शबाना महमूद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं,
“हे आमच्या सीमांचं रक्षण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. लहान बोटींनी ब्रिटनमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा विचार करणाऱ्यांनी समजून घ्यावं – आम्ही तुम्हाला हद्दपार करू.”
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, शेवटच्या क्षणी न्यायालयीन मार्गाने हद्दपारी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील ते ठामपणे विरोध करतील. तथापि, छळातून पळून जाणाऱ्या शरणार्थींना कायदेशीर व सुरक्षित मार्गाने मदत करण्याची जबाबदारी ब्रिटन नाकारत नाही.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, हद्दपार झालेला भारतीय नागरिक आता फ्रान्समध्ये आहे. त्याला स्वेच्छेने भारतात परतण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी फ्रान्स व ब्रिटन या दोन्ही देशांनी दाखवली आहे. मात्र, जर त्याने ही योजना स्वीकारली नाही, तर त्याला आश्रय अर्ज करण्याचा अधिकार गमवावा लागेल आणि सक्तीच्या हद्दपारीला सामोरे जावं लागेल.
ब्रिटनच्या गृह कार्यालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थलांतर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलेल्या भारतीयांची संख्या गेल्या एका वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे. एकूण २,७१५ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे आकडे भारतीय स्थलांतरितांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधतात.
या प्रकारामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. खरंच का लोक आपल्या देशातून पळून जाण्यासाठी जीव धोक्यात घालून बोटींमध्ये चढतात? यामागे गरिबी, रोजगाराचा अभाव, चांगल्या जीवनमानाची इच्छा, किंवा काही वेळा तस्करांकडून फसवणूक या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम दिसून येतो. या भारतीय नागरिकाचं नेमकं पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्याच्या घटनेमुळे हजारो लोकांच्या भावनांना हात घालणारा प्रश्न उभा राहतो “कायद्याचे उल्लंघन करूनही चांगलं जीवन मिळवण्याची धडपड की सुरक्षित भविष्याची निराशा?”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Geopolitics : पाकिस्तान-सौदी जवळीक जर संरक्षण ढाल; तर India-UAE करार भविष्याच्या गुंतवणुकीची वाटचाल
या हद्दपारीनंतर ब्रिटननं संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, बेकायदेशीर स्थलांतरावर ते आता कठोर पवित्रा घेणार आहेत. विशेषतः फ्रान्समार्गे लहान बोटींनी इंग्लंडमध्ये येणाऱ्यांवर आता कडक नजर ठेवली जाईल. भारतीय नागरिकाचा हा प्रकार त्यामुळे फक्त एक घटना राहिलेला नाही, तर जागतिक स्तरावर भारतासह अनेक देशांसाठी हा धडा आहे की बेकायदेशीर मार्ग निवडणाऱ्यांना आता मोठ्या जोखमींना सामोरं जावं लागेल. ब्रिटन सरकारची ही पहिली मोठी कारवाई बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा देऊ शकते. भारतीय नागरिक हद्दपारीच्या या घटनेनं फक्त कायदेशीर नव्हे तर सामाजिक आणि मानवतावादी चर्चांनाही वाव दिला आहे. जगभरातील स्थलांतरितांसाठी ही घटना एक इशारा ठरू शकते सुरक्षित भविष्य फक्त कायदेशीर मार्गानेच मिळू शकतं.