पुणे : डेटिंगची हाऊस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली असून, ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर गुन्हेगार तरुणीने तब्बल १७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन श्रेया असे नाव सांगणार्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते एका खासगी कंपनीत सध्या नोकरी करतात. कुटुंबासह ते राहण्यास वारजेतील पॉप्युलरनगर येथे आहेत. दरम्यान, ते घरी एकटे असताना त्यांना एका अनोळखी महिलेचा फोन आला. तिने तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी ज्येष्ठाने त्यांना फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणीने त्यांना फोटो पाठवून तसेच संबंधित मुली डेटिंगसाठी देते असे सांगत त्यांना प्रथम फोनद्वारे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बँकेत पैसे भरण्यास लावले.
१७ लाख १० हजार रुपये भरल्यानंतर देखील मुलगी न देता त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बागवे हे करत आहेत.