कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात (Photo Credit- X)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून, येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि समृद्ध वारसा यामुळे लाखो पर्यटक येथे येतात. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या जिल्ह्यात न थांबताच पुढे जात असल्याने स्थानिकांसह विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या ‘कोकण रेल्वे’च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील ‘सिंधुदुर्ग’ हा… pic.twitter.com/kMQLfKotFn — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 7, 2025
पवार पत्रात म्हणतात, “लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसल्याने इथले नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांना प्रवासात मोठी गैरसोय होते. त्यामुळे स्थानिक अर्थकारणावरही विपरित परिणाम होत आहे.”
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पवारांनी रेल्वे मंत्र्यांकडे विशिष्ट कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याची विनंती केली आहे. जसे की, पर्यटन हंगाम, प्रमुख सण गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी. शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर थांबे दिल्यास या मागणीची व्यवहार्यता स्पष्ट होईल.
रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे अनेक फायदे होतील. यामुळे केवळ तळकोकणातील नागरिकांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळणार नाही, तर महाराष्ट्राच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. स्थानिकांना प्रवासाची सोय उपलब्ध होईल आणि येथील स्थानिक उत्पादने तसेच हस्तकला वस्तूंच्या वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळेल. शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालून हा महत्त्वाचा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे मांडला आहे. आता रेल्वे मंत्रालय यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया