सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. त्यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केलाच आहे. त्यासोबत त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत पातळी सोडून टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं, पण फार गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलं नाही, अशी शंका येईल, असं त्यांचं उत्तर होतं, अपेक्षा करूया, राज्यात चांगलं वातावरण होईल, मी त्यावरती समाधानी नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
पडळकरांच्या टीकेच्या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी अशी गलीच्छ टीका करणं योग्य नाही, असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं. तसेच गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे, असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितलं होतं, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना फोन करून अशा टीका करणं किंवा वक्तव्य करणं टाळावं असं म्हटलं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अपेक्षा करूया चांगलं वातावरण होईल असं म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
“माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून”, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत अतिशय खालच्या शब्दांत देखील टीका केली. त्यांनी वापरलेले शब्द आक्षेपार्ह असे आहेत.