पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट इमारतीला प्रत्यक्षात वापरात आणावे. व लोकांच्या सेवेसाठी भाजी मार्केट तातडीने खुले करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिला आहे. याबाबतीत कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
गिरीश गुरनानी म्हणाले, पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या सुतार दवाखाण्याजवळ मोठी वर्दळ असते. अनेक भाजी व फळ विक्रेते येथे रस्त्यावर आपला माल विकत असतात. अशातच येथे होणारी गर्दी लक्षात घेता शासनाने एक अधिकृत इमारत बांधून त्यात मंडई चालू करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. त्याचं अनुषंगाने टॅक्स भरणाऱ्यांचे अनेक पैसे खर्च करून ही इमारत बांधण्यातही आली. तिचे नामकरण लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट असे करण्यात आले. परंतु अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ही इमारत तिचे उद्देश साधण्याच्या प्रतीक्षेत आहे. मोकळी इमारत ही वाया गेलेला लोकांचा निधी व वेळ दर्शवते. तरी प्रशासनास विनंती की लकरात लवकर ठोस पाऊले उचलून या इमारतीला कामी आणावे व लोकांच्या सेवेसाठी भाजी मार्केट खुले करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गिरीश गुरनानी यांनी दिला आहे.
भाजी मंडई इमारतीचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. नागरिकांना रस्त्यावरच भाजी विक्री साठी बसावं लागत आहे. अतिक्रमण विभागाला सूचना दिल्या आहेत. मंडई विभागकडं पाठपुरावा सुरु आहे.
– विजय नायकल (सहाय्यक आयुक्त, कोथरूड, बावधन क्षेत्रीय कार्यालय)
भाज्यांच्या दरात मोठी वाढ
यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन त्यांचे उत्पादन घटले होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाज्यांच्या पिकाची लागवड करण्यात आली. परंतु सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नसल्यामुळे भाजी काढणीसाठी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बाजारात काही भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. गेले काही दिवसांपासून बाजार समितीत दुधी भोपळा, गवार, कोबी, दोडका, वांगी, शेवगा या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.