सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर : मारकडवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला आता आणखी व्यापक स्वरूप येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी मारकडवाडी गावाला भेट देणार आहेत. रविवारी शरद पवार मारकवडवाडी येथे येणार असून, राहूल गांधीही मारकरवाडी येथून लाँग मार्च काढणार आहेत. शिवसेना उबाठा प्रमूख उद्धव ठाकरे १२ तारखेला गावकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील मारकवडवाडी येथे अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने येथील नवनिर्वाचीत आमदार उत्तम जानकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी इव्हीएम मशिनचा घोटाळा असल्याचा आरोप केला. त्यानंतर बॅलेटपेपरवर या गावचे मतदान घेण्याची मागणी केली. प्रशासनाने ती मागणी फेटाळली. त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांच्यासह काही जणांनी मिळून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी सुरू केली. परंतु प्रशासनाने त्यास विरोध दर्शवत तब्बल ८९ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण आता अधिकच चिघळत चालले असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मारकवाडी येथे भेट देण्यासाठी रविवार ८ रोजी येणार आहेत. तर काँग्रेसचे खा. राहूल गांधी हे देखील काही दिवसांतच मारकडवाडी येथे येणार आहेत.
राहूल गांधी लाँग मार्च काढणार आहेत. विशेष म्हणजे हे गाव ज्या मतदारसंघात आहे त्या माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर हे सुमारे १३ हजार मतांनी निवडून आले आहेत. परंतु मारकडवाडी गावातून त्यांना अपेक्षीत असे मताधिक्क्य मिळाले नाही. तर संपूर्ण गाव आपल्यासोबत असतानाही मताधिक्क्य मिळाले नसल्याने हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला. आता या प्रकरणाला आणखी व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : पराभवानंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; नाना पटोलेंनी दिली सविस्तर माहिती
नाना पटोले काय म्हणाले?
लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
मारकडवाडी गाव चर्चेत
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले. मात्र सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता. गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता. याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लावण्यात आले होते. आता या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.