मुंबई : आज विधीमंडळामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार एकमेकांसोबत भिडले. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची विधीमंडळातील लॉबीवर धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली असून शिंदे गटातील अंतर्गत धूसमूस आता बाहेर येऊ लागल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर विरोधक आक्रमक झाले असून महाविकास आघाडीने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गट व शरद पवार गटाने शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
शिंदे गटातील झालेल्या या धक्काबुक्कीनंतर ठाकरे गटाने आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन ट्वीट करत शिंदे गटाला सुनावले आहे. ठाकरे गटाने पोस्ट करत लिहिले आहे की, सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके आता एकमेकांना धक्काबुक्की करु लागले आहेत. स्वतः बदनाम आहेतच पण ह्यांनी महाराष्ट्राला सुध्दा पुर्ण बदनाम करण्याचं ठरवलंय! असा घणाघात ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर महायुतीमधील शरद पवार गटाने देखील भलं मोठं पत्र लिहित शिंदे गटाच्या नेत्यांमधील या भांडणावर ताशेरे ओढले आहेत.
रस्त्यावरचं गँगवाॅर आता प्रतिभावान राजकीय परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पाय-या चढून लाॅबीपर्यंत येऊन पोहोचलंय. अशावेळेस जेव्हा विधिमंडळच सत्ताधारी असंविधानिक महायुती सरकारला पत्र लिहून आपल्या भावना मांडते… पत्रास कारण की… pic.twitter.com/C2NFVWF9Z0
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 1, 2024
शरद पवार गटाने ‘पत्रास कारण की…’अशा मथळ्याखाली घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात लिहिले आहे की, “विधिमंडळ म्हणून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण तुम्ही सत्तेवर आलात आणि माझ्याच आवारात कार्यरत आहात ते स्वतःच्या मंत्रिपदाचे खुर्चीचे आणि सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याच आवारातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन आपण अभिवादन करता पण इमारतीत येऊन मात्र गॅंगवर करता. सबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो पण जेव्हा रस्त्यावरचे गॅंगवरच माझ्या आवारात घडतं तेव्हा गेले अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानाला तडा जातो. महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष म्हणजे मी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण बदलाचे निर्णय झाले ते माझ्याच आवारात.” अशा प्रकारचे पत्र शरद पवार गटाकडून लिहिण्यात आले आहे.