मुंबई : मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्जत येथे पार पडलेल्या सहकार मेळाव्यामध्ये जोरदार बॅटिंग करत राजकारण्यांवर (Political News) टीकेची झोड उठवली. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि पक्ष बदलून सत्तेमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. “महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सहकार चळवळ उभी राहिली. मात्र आता असलेले सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. तर ‘सहारा’ चळवळ आहे. अडकलेल्यांना सहारा द्या. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून चोख प्रत्युत्तर राज ठाकरे यांना दिले आहे.
सध्याच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झालेले आहेत. राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे’ त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्यांनी आपल्या विचारांना तिलांजली देऊन स्वाभिमान गहाण ठेवला असेल, त्यांना हे लागू होईल. आम्ही पक्षांतर केले म्हणून ते आम्हाला बोलले, असे कुणाला वाटत असेल तर आम्हाला मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. कारण आम्ही भगव्या झेंड्याच्या विचाराने 35 वर्ष पक्षाचे काम केले. ते विचार आम्ही सोडलेले नाहीत. ज्यांनी हे विचार सोडले त्यांना राज ठाकरे जे बोलले ते लागू होईल.” असे मत गुलाबराव पाटील यांनी मांडले.
तसेच ‘गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा असून महाराष्ट्राचे तुकडे होतील’ अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ हे राज ठाकरेंचे विचार आहेत. पण यावर महाराष्ट्र चालेल की नाही?” याची मला कल्पना नाही.
आमदार संजय शिरसाट यांची सकारात्मक प्रतिक्रिया
त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली मात्र आम्ही त्याची टीका सकारात्मक पद्धतीने घेऊ असे मत त्यांनी व्यक्त केले. शिरसाट म्हणाले, “ते एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा विषय आहे. सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. पण राज ठाकरे यांनी काही आरोप केले, तर निश्चितच त्याचा त्रास आम्हाला होतो. त्यांच्या बोलण्यात नेहमीच वेगळेपण असते. त्यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत असून जर आमचे काही चुकत असेल तर ते निश्चितच दुरुस्त करू.”