मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र यावेळी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॉबी परिसरामध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. त्यांच्यामध्ये भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. मात्र हे भांडण कशामुळे झाले याचे खरे कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री दादा भुसे हे ॲरोगंट मंत्री आहेत असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
दादा भुसे ॲरोगंट आहेत
माध्यमांशी संवाद साधताना आमदार महेंद्र थोरवे यांनी विधीमंडळामध्ये झालेल्या भांडणाचे खरे कारण सांगितले. थोरवे म्हणाले, आम्ही प्रमाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. माझं दादा भुसे यांच्याशी खात्याशी संबधित माझं काम आहे, त्याबाबत मी भुसे यांना विचारलं माझ्या मतदारसंघातील काम का होत नाहीये. मी मतदार संघातील कामाबाबत प्रश्न केला तेव्हा त्यांचा आवाज वाढला. आम्ही देखील आमदार आहोत. त्यांना आम्ही मंत्री केलं आहे. आमदारांची कामे होत नाहीत. होत नसतील तर काय करणार? दादा भुसे ॲरोगंट, आमच्यामुळे ते मंत्री आहेत, मी त्यांच्या घरचं खात नाही, अशा शब्दांत आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेंवर जहरी टीका केली आहे.
मी तुमच्या घरचं खात नाही
त्याचबरोबर दादा भुसे मुद्दाम काम करत नसल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केला. महेंद्र थोरवे पुढे बोलताना म्हणाले, ”मंत्री असणारे दादा भुसे सामान्य निमित्ताने त्यांच्या खात्यातील गोगावले, मी स्वतः असेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्यांना कॉल करून सांगितलं, काम करून घ्या परंतु दादा भूसेंना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामे काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतली आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केले गेले नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर, ते माझ्यासमोर चिडून बोलले. आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत, अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे, ते जनतेचे काम. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी तुमच्या घरचं खात नाही मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे”, अशा शब्दांत आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भूसे यांच्या सोबत झालेल्या धक्काबुक्कीचे खरे कारण सांगितले.