राज्यसभे(Rajyasabha Election)च्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सकाळी मविआ (MVA) नेत्यांच्या शिष्टमंडळाने भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, मविआने भाजपला प्रस्ताव देण्यात आला. मात्र, भाजपने हा प्रस्ताव धुडकावून लावत मविआलाच प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता शिवसेनेने सोमवारी संध्याकाळी बैठक बोलावली आहे. यावेळी, राज्यसभा निवडणुकीसह विधान सभेसाठी रणनिती आखण्यात येणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना ८ ते १० जून रोजी मुंबईत येण्यास सांगितले आहेत. मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर राहण्यासाठी येण्याचे त्यांना आदेश दिले आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या १० जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ८ जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, त्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनिती आखल्याची माहीती सूत्रांनी दिली.






