रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यात सोशल मीडियावर व्यंगचित्रांमधून पलटवार
Maharashtra Politics : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील सोशल मीडिया वॉर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली असून धंगेकरांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू आहे. याआधी शिवसेना नेते निलेश राणे यांनीही नवनाथ बन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
धंगेकर यांनी कार्टून स्टाइलमधील एक फोटो पोस्ट केला. या चित्राच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालय आणि कमळाचं चिन्ह दाखवण्यात आलं असून, एक व्यक्ती कुत्र्याला पाव खाऊ घालत असल्याचं चित्र आहे. या पोस्टसोबत धंगेकरांनी नवनाथ बन यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली.
हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!! अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला. #बनश्वान #चिल्ला_पुकार #Paid_Animal https://t.co/vsGpMDHOv5 — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 31, 2026
दुसरीकडे नवनाथ बन यांनीही सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिलं. त्यांनी रवींद्र धंगेकर यांचा चेहरा असलेला रंग बदलणाऱ्या सरड्याचा फोटो पोस्ट केला. या चित्रात धंगेकरांच्या अंगावर त्यांनी यापूर्वी काम केलेल्या काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेची चिन्हं दाखवण्यात आली आहेत. दोन्ही नेत्यांच्या या पोस्टमुळे भाजप आणि शिंदेसेनेतील वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे.
काय म्हणतात पुणेकर
रंग बदलू धंगेकर! https://t.co/l0N3fBqcog — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 31, 2026
या सगळ्या प्रकारात आता एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नका, असा सल्ला त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर नेत्यांना दिल्याचं समजतं. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्याऐवजी दुष्काळी भागातील नागरिकांना मदत करण्याच्या कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यातील सोशल मीडिया वॉर थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
Ans: दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करणारी व्यंगचित्रात्मक छायाचित्रे पोस्ट केली. त्यातून हा वाद अधिक चर्चेत आला.
Ans: महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत आणि राजकीय टीका-टिप्पणीऐवजी दुष्काळी भागातील मदतकार्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.






