पुणे – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना बुरुजा जवळील कडा कोसळला. त्यामध्ये पुण्यातील एका 31 वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. हेमंत धिरज गाला ( वय, 31 रा. मित्र मंडळ चौक, पुणे ), असे या मृत गिर्यारोहकाचे नाव आहे.
आतकरवाडी येथून काल ( 25 जून ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या दिशेने ट्रेकिंग स्पर्धेला सुरुवात झाली होती. यामध्ये राज्यातील जवळपास तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये पुण्यातील हेमंत गाला याने 22 किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला. सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्याजवळ आल्यावर अचानक तेथील बुरुजाचा कडा कोसळला. त्या कडासोबत हेमंत हा दीडशे फुट खोल दरीत जाऊन पडला. त्याघटनेत हेमंतचा जागीच मृत्यू झाला आहे.घटना घडल्यानंतर त्याचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने काढण्यात आला आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या गिर्यारोहकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.