Shooting in Lakshmi Nagar! Shots fired at a notorious thief by the police, 2 cartridges seized with a country knife
अमरावती : स्थानिक लक्ष्मी नगर (Lakshmi Nagar) परिसरात स्वातंत्र्य दिनी सकाळी गुंगारा देत पळून जात असलेल्या कुख्यात आरोपीवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ राऊंड गोळी (Police fired 2 rounds) झाडल्या. या गोळीबारात एक गोळी लागल्याने टायर पंक्चर होत कार इलेक्ट्रिक खांबाला धडकली. त्यामुळे अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch Police) आरोपींना फिल्मी स्टाईल (Filmystyle) पकडले. पोलिसांनी कुख्यात आरोपी अकोला डाबकी रोड निवासी राजू बाजीराव राऊत (३०) व अकोला जुना शहर गायत्री नगर निवासी पवन अनिल काळे (१९) या दोघांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त दिशा निर्देशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना हे अकोला पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराची चौकशी करणार आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अकोला शहरातील डाबकी रोड येथे राहणारा राजू बाजीराव राऊत (३०) हा आंतरराज्यीय व कुख्यात चोर आहे. महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) अन्य राज्यात त्याच्या विरोधात ३४ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेशात देशी कट्ट्यातून फायरिंग करीत २ हत्या, हत्येचे प्रयत्न, लूटमार, अत्याचार असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात राजू राऊत बऱ्याच काळापासून अटक झाला नसल्याची माहिती आहे. अकोला पोलीस राजू राऊत याचा कसून शोध घेत होते. राजू राऊत हा अमरावतीच्या लक्ष्मी नगरात दुर्योधन नामक नातेवाईकाच्या घरी लपला असल्याची माहिती अकोला स्थानिक गुन्हे शाखेला (Akola Local Crime Branch) मिळाली.
त्या माहितीच्या आधारे अकोला एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोके यांच्या नेतृत्वात एक पथक सोमवारी सकाळी अमरावतीत पोहोचले. मात्र, अकोला पोलिसांनी स्थानिक गाडगे नगर पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीच पूर्व सूचना न देता स्वत:च लक्ष्मी नगरात राजू राऊतच्या नातेवाईकच्या घराजवळ सापळा रचला.
पोलीस येण्याची भनक लागताच राजू हा सतर्क झाला. त्याने गावठी कट्टा ताणत पोलीस पथकाला धमकविण्याचा प्रयत्न केला. सोबत एम.एच. १५ एच. जी. ५७७७ या क्रमांकाच्या बलेनो कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने त्यांच्या वाहनाने राजूचा पाठलाग केला आणि कार थांबविण्याकरिता एका नंतर एक असे दोन फायर केले. त्यामुळे टायर पंक्चर झाल्याने कार वीजेच्या खांबाला धडकली. पोलिसांनी राजू व त्याचा साथीदार पवन याला ताब्यात घेतले.
लक्ष्मी नगरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करीत दोन खाली काडतूस घटनास्थळावरून जप्त केले. तर आरोपींपासून देशी कट्टा व २ जिवंत काडतूस जप्त केले. अकोला पोलिसांनी अमरावती शहरात येत कारवाई करण्यापूर्वी स्थानिक गाडगे नगर पोलिसांनी कोणतीच माहिती दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कुख्यात आरोपीवर गोळीबार करण्याच्या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून चौकशीचे आदेश प्राप्त झाले आहे. अकोला पोलिसांच्या चौकशीचे अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना देण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.