फोटो सौजन्य - Social Media
संतनगरी शेगावातून गजानन महाराजांची पालखी आज (रविवार) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ७ वाजता श्रींच्या मंदिर परिसरातून पालखी मार्गस्थ होणार असून, यंदाच्या वारीत सुमारे ७०० वारकरी सहभागी होणार आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे हे श्रींच्या पालखीचे सलग ५७ वे वर्ष आहे.
पालखीसोबत रथ, मेणा, अश्व, पताकाधारी, टाळकरी आणि शेकडो वारकरी सहभागी होणार असून, “जय हरी विठ्ठल”, “जय गजानन श्री गजानन” आणि “गण गण गणात बोते” अशा नामघोषांनी वातावरण भक्तिमय होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अखंड हरिनाम संकीर्तन करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवासाला सुरुवात करतील.
ही वारी तब्बल ३३ दिवसांची असून पालखी सुमारे ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करून २३ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. रविवारी शेगावातून निघाल्यानंतर पालखी क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानात दर्शनासाठी जाईल. त्यानंतर महाप्रसाद ग्रहण करून अकोला जिल्ह्यातील पारस येथे रात्रीचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी दुपारी गायगाव आणि रात्री भौरद येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तसेच २३ आणि २४ जून रोजी अकोला येथे पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम नियोजित आहे.
पुढे निश्चित मार्गाने प्रवास करत श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होईल. तेथे २३ ते २८ जुलै या कालावधीत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे. आषाढी एकादशीच्या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर २९ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.
पंढरपूर ते शेगाव हा सुमारे ५५० किलोमीटरचा पायी प्रवास असून, येण्या-जाण्यासह वारकरी एकूण सुमारे १,३०० किलोमीटरचे अंतर भक्तिभावाने पार करणार आहेत. परतीच्या प्रवासात १८ ऑगस्ट रोजी खामगाव येथे मुक्काम झाल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी श्री गजानन महाराजांची पालखी पुन्हा संतनगरी शेगावमध्ये आगमन करणार आहे.
शिस्त, भक्ती आणि सेवाभावासाठी ओळखली जाणारी ही पालखी दरवर्षी हजारो भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरते. संत गजानन महाराजांच्या नामस्मरणात आणि विठ्ठलभक्तीच्या वातावरणात पार पडणारी ही वारी महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक मानली जाते.






