मोहोळ रेल्वे स्टेशन येथे ३ सप्टेंबर पासून सिध्देश्वर एक्सप्रेस थांबणार
मोहोळ / दादासाहेब गायकवाड : पाच वर्षांपासून बंद झालेल्या रेल्वे थांब्यांपैकी सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा नुकताच मंजूर झाला असून, 3 सप्टेंबरपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस मोहोळमध्ये प्रत्यक्षात थांबायला सुरू होत आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून, अखेर पाच वर्षानंतर मोहोळ येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबायला सुरुवात होणार आहे.
कोरोनापूर्वी मोहोळमध्ये सिद्धेश्वर एक्सप्रेस चेन्नई मेल, सोलापूर-मिरज आणि पॅसेंजर या गाड्या थांबत होत्या. मात्र, कोरोनामध्ये देशाचा व्यवहार ठप्प झाल्यामुळे या गाड्या थांबण्याचे बंद झाले. त्यानंतर सर्व गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झाले असताना मोहोळ येथे मात्र पूर्वी थांबणाऱ्या गाड्या अजिबात थांबत नव्हत्या. यासाठी भाजपचे सोलापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.अविनाश काळे, तालुका संघटन सरचिटणीस महेश सोवनी, मोहोळचे प्रथम माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, वकील संघटना, व्यापारी संघटना, कामगार संघटना, प्रवासी संघटना आदींनी प्रयत्न केले होते.
डिसेंबर २०२४ मध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मराज मीना यांनी मोहोळ स्टेशनची पाहणी केली होती. त्यावेळी व्यापारी संघटना, वकील, पत्रकार संघटना, विविध राजकीय पक्ष, प्रवासी संघटना आदींनी त्यांना भेटून बंद पडलेले सर्व गाड्याना थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर लोकसभेच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे एक शिष्टमंडळ या मागणीसाठी नेले होते. त्या शिष्टमंडळात शिवसेना महिला आघाडीच्या उबाठा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमा पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, प्रा. चंद्रकांत देवकते, काँग्रेसचे सरचिटणीस संतोष शिंदे, विक्रांत दळवी, ॲड. लाळे आदींचा समावेश होता.
सर्वांच्या मागणीनुसार गेल्या पंधरा दिवसांपूर्वी थांब्याला अंतिम मंजुरी मिळाली आणि 3 सप्टेंबरपासून जाताना आणि येताना सिद्धेश्वर एक्सप्रेस मोहोळमध्ये थांबणार असल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे मुंबई, पुणे, व दौंड कडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काही एक्सप्रेसच्या थांब्यासाठी मागणी
मुंबई चेन्नई मेल, कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस, सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस, आणि कोणार्क एक्सप्रेस यांना थांबा मिळावा यासाठी मागणी केली असून त्याचाही पाठपुरावा नियमितपणे सुरू राहील.
– ॲड.अविनाश काळे, जिल्हा कार्याध्यक्ष, प्रवासी संघटना
तिकीट काढण्यासाठी जावे लागणार सोलापुरात
दरम्यान, मोहोळ येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबणार असली तरी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी सोलापूर किंवा कुर्डुवाडी येथे जावे लागणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे व लवकरात लवकर तिकीट खिडकी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मुंबईहून सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस पहाटे 5 वाजून 33 मिनिटांनी मोहोळ रेल्वे स्थानकावर येणार आहे, तर सोलापूरहून मुंबईला जाणारी हीच गाडी रात्री 10 वाजून 53 मिनिटांनी मोहोळ रेल्वे स्थानकावर येणार आहे.