
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Yavatmal News: निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मदत मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. लाखोंचे नुकसान आणि मदत मात्र तुटपुंजी, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, या मदतीबाबत अधिकृत घोषणा आणि अंमलबजावणीची स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक आहे. दुसरीकडे, प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळणार की नाही, मिळणार असल्यास ती कधी मिळणार, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी भूमिका मंत्रिमहोदयांकडून मांडण्यात आली होती. तसेच महसूल, कृषी विभाग आणि गावपातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे, चौकशी करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री तसेच विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया राबवत दुष्काळ जाहीर केला. यावेळी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत दिली जाईल, अशी आश्वासनेही देण्यात आली होती.
दरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली आणि विविध अर्ज व फॉर्म भरून घेतले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अहवाल शासनदरबारी अडकले आहेत की मदतवाटपाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असताना त्यांना मिळणारी मदत त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत पुरेशी असणार का? शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन मदतीबाबत तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांवर न ठेवता शासनाने ठोस निर्णय घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक भरपाई, पीकविमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे.