स्मार्ट मीटरवरून ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांची सहमती न घेता सुमारे २०० घरांमध्ये जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देत जोरदार निदर्शने केली.
हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली
स्मार्ट मीटरच्या विरोधात तालुक्यात आधीच असंतोष असताना करवडीतील ही घटना अधिकच चिघळली. काही ठिकाणी घरात कोणी नसताना परप्रांतीय कामगार येऊन मीटर बसवून जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. नादुरुस्त मीटरच्या नावाखाली सरसकट बदल करण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, सीमा घार्गे, शिवाजी चव्हाण, तुकाराम नलवडे, अमित डुबल यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सहमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुने मीटरच पुन्हा बसवावेत, अशी ठाम मागणी केली.
हे देखील वाचा : बाबो! अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, ग्राहकांमध्ये खळबळ, काय आहेत आताचे दर?
दरम्यान, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच यापुढे ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, भविष्यात पुन्हा अशीच मनमानी झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.






