तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू : रांजणे
मेढा : जावली तालुक्यात दहशत, दंडेलशाही, दडपशाही, दारू असलं वातावरण कुणी आणलं हे संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला माहित आहे. शांत असलेले वातावरण प्रदेशाध्यक्षांनी बिघडून टाकलं. आमचं बहुमत असताना ठराव आमचेच होणार. मात्र, यांनी मारामारीवर प्रकरण नेलं. त्यांनी दोन हात केले तर आम्हीही चार हात करायला तयार आहोत, असा इशारा जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिला.
शशिकांत शिंदे यांना पुन्हा जावली तालुक्यात आमदारकी लढवायची आहे. त्यांनी आता आमदारकी आणि जिल्हा बँक विसरून जावी. त्यांनी जावलीत ढवळाढवळ करू नये, त्यांनी हात कापले तर आम्ही त्यांचे पाय कापू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी दिला.
‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील सोसायटी ठरावांवरून सुरु असलेल्या राजकीय संघर्ष आता अधिकच पेटला आहे. आखाडे येथील सोसायटीच्या ठरावाच्या वादातून शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक रणजीत शिंदे यांना हुमगाव येथे मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. ही मारहाण प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सांगण्यावरूनच झाली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल करण्यात आला.
या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखाना अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, मंडल अध्यक्ष संदीप परामणे,मारुती चिकने, उपसभापती गोरख महाडिक उपस्थित होते.
यावेळी मानकुमरे यांनी आक्रमक भूमिका घेत दहशतीचे उत्तर दहशतीने देणार. कोणी अंगावर आले तर फाडून टाकू, असा थेट इशारा दिल्याने जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
ज्ञानदेव रांजणे यावेळी म्हणाले आता बँकेची निवडणूक लागली. शांत असलेले वातावरण यांनी बिघडवून टाकल, शशिकांत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेला आम्ही पण जशास तसे उत्तर देऊ. शशिकांत शिंदे यांचे जे कोण गुंडपुंड आहेत. त्यांना सांगायचय तुम्ही दोन हाताची तयारी ठेवाल तर आमची चार हातांची तयारी आहे. जी तुमची दडपशाही आहे ती शिवेंद्रसिंहराजे उखडून टाकण्याचं काम कायमस्वरूपी करणार.

