वडूज : ज्या लोकांनी आपल्या विभागात केलेल्या उल्लेखनीय पर्यावरण तथा सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पर्यावरण व सामाजिक उपक्रमांवर कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत’ या संघटनेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशन २०२२ अंतर्गत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान रविवारी (दि.५) पर्यावरणदिनी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे करण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पर्यावरण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, सचिव दीपक काळे, माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रिया महेश शिंदे, माहिती व जनसंपर्क प्रमुख डॉ. विनोद खाडे आदी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत राज्यातील विविध ठिकाणच्या व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय पर्यावरण मित्र, राष्ट्रीय समाजरत्न, राष्ट्रीय पक्षी मित्र, राष्ट्रीय हिरकणी असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सातारा जिल्ह्यातून कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सरपंच परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, माण खटाव प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी, खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, तहसीलदार किरण जमदाडे, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, माण खटाव ड्रिम सोशल फाउंडेशनच्या अनुराधा प्रभाकर देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा बर्गे, प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, डॉ. प्रवीण चव्हाण, पाणी फाऊंडेशनचे अजित पवार, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, ग्रामपंचायत वरुड आदींचा समावेश असून, सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रमुख भाषणात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुरस्कार मिळण्यासाठी काम करू नका, तर आचार, विचार, उच्चार सरळ व स्वच्छ ठेऊन काम करा, झाडं लावा, झाडं जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पुरस्कार तुमच्या मागे येतील, अशा शब्दांत मार्गदर्शन केले. तर प्रभाकर देशमुख यांनी जलसंधारण सचिव असताना खूप चांगली कामं केल्याचं ही अण्णा हजारे यांनी सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे राज्य, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.