
फोटो सौजन्य सोशल मीडिया
सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ६०४२ येथील जागा चित्तोड राजपूत लोहार समाजाच्या उमाजी संस्थेला सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमासाठी देण्याचा प्रस्ताव सभासद भारतसिंग बडूरवाले आणि बिज्जू प्रधाने यांनी मांडल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच जागेवर अन्य काही संघटनांनीही दावा केल्याने जागा नेमकी कोणाच्या ताब्यात किंवा उपयोगासाठी द्यायची, यावरून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
या जागेसाठी विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. काही पदाधिकारी आपल्या समाजातील नगरसेवकांना पुढे करून आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात हेलपाटे मारत असल्याचीही चर्चा आहे. त्यातूनच संबंधित संस्थेच्या नावाने प्रस्ताव आणून जागा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
विशेष म्हणजे, ही जागा शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे दहा हजार चौरस फुटांच्या या भूखंडाचे भविष्यातील व्यावसायिक व विकासात्मक मूल्य मोठे आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका संस्थेला जागा देण्यापूर्वी महापालिकेने सर्व दावे, मालकी हक्क, आरक्षण, वापराचा उद्देश आणि कायदेशीर बाबींची सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या जागेवरील जुन्या इमारतीला धोकादायक म्हणून नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित परवानगीच्या आधारे इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या या ठिकाणी सपाट मैदान आहे. मात्र, इमारत पाडण्यापासून पुढील प्रक्रियेपर्यंत मराठा समाजाच्या एका व्यक्तीने व्यक्तींनी विशेष पुढाकार घेतल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
शिवसेना गटनेते, अमोल शिंदे म्हणाले की, महापालिकेची जागा समाजाच्या गोंडस नावाखाली भाडेतत्त्वावर देणे योग्य नाही म्हणून बहुमताच्या जोरावर पास झालेला ठराव गोंधळामुळे ठेवावा लागला अशाप्रकारे महापालिकेच्या कोणत्याही जागा कोणालाही देण्यात आमचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात आम्ही अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू.