
भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
Solapur News: पावसाअभावी भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असतानाच नदीपात्रावर वाळू चोरांचा डल्ला सुरू झाल्याचा आरोप होत आहे. पंढरपूर तालुक्यातील अनेक नदीकाठच्या गावांमध्ये रात्रीच्या अंधारात तसेच पहाटे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे दुष्काळामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना दुसरीकडे कोरड्या भीमा नदीपात्रातील वाळू उपसली जात असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी होत असतानाच नदीपात्रातून राजरोसपणे वाळू बाहेर काढली जात असल्याचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी वाहने नदीपात्रात येतात, वाळू उपसा केला जातो आणि त्यानंतर वाहतूकही केली जाते. असे प्रकार सुरू असताना महसूल व पोलिस यंत्रणेला याची माहिती मिळत नाही का, की माहिती असूनही कारवाई होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच नदीच्या नैसर्गिक पात्राची आणि पर्यावरणाची हानी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पथक नेमून रात्रीची गस्त वाढवावी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला स्पष्ट सूचना देऊन नदीकाठच्या गावांमध्ये धडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नदीपात्रातील वाळू हा केवळ महसुलाचा स्रोत नसून नदीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी आणि पर्यावरणीय समतोलासाठीही महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यास नदीपात्राची खोली व रचना बदलून भविष्यात पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित यंत्रणांनी नियमित गस्त आणि संशयित ठिकाणांवर छापे टाकण्याची गरज आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये तलाठी व पोलिस पाटील यांची स्थानिक पातळीवर महत्त्वाची भूमिका असते. नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाहने ये-जा करीत असतील, तर त्याची माहिती स्थानिक यंत्रणेला का मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित गावांमध्ये अवैध वाळू उपशाबाबत पोलिस पाटील पुढे का येत नाहीत, याचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज; दररोज 11 हजार मेट्रिक टनांहून…
दुष्काळामुळे नदीपात्र कोरडे पडले असताना वाळू उपशाला उधाण आल्याचा आरोप आहे. केवळ पंचनामे आणि कागदी कारवाई न करता प्रशासनाने नदीपात्रात उतरून प्रत्यक्ष कारवाई करावी. वाळू चोरी झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा चोरी होणारच नाही, अशी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.