
फोटो सौजन्य सोशल मीडिया
हा देखावा गावासह पंचक्रोशीतील गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, मोठ्या उत्साहाने भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. स्वामी परिवाराच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वामी परिवाराकडून दरवर्षी गौरी-गणपती उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करण्याची परंपरा जपली जाते. यंदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकांची संकल्पना निवडण्यात आली आहे. गणपतीच्या विविध स्वरूपांचे दर्शन एकाच ठिकाणी घडविण्यात आले असून, देखाव्यातील कलात्मक रचना, आकर्षक प्रकाशयोजना, सुबक सजावट आणि प्रत्येक मूर्तीची बारकाईने केलेली मांडणी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अष्टविनायकांचा हा देखावा साकारण्यासाठी स्वामी परिवारातील सदस्यांनी तब्बल वीस दिवस अथक परिश्रम घेतले. मनोज स्वामी, विनायक स्वामी, विश्वेश स्वामी, पूजा स्वामी, श्रीयांश स्वामी यांच्यासह परिवारातील सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सजावट आणि देखाव्याची उभारणी केली. घरगुती वातावरणात साकारलेला हा देखावा धार्मिक भावनेबरोबरच कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक संस्कार, पारंपरिक मूल्ये आणि सामाजिक एकात्मता जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने देखाव्याला भेट देत आहेत.
भाजप नेते बिपीन करजोळे यांनीही स्वामी परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन अष्टविनायक देखाव्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्वामी परिवाराच्या कल्पकतेचे अभिनंदन केले. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक जतन आणि कलात्मक सादरीकरणाचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सध्या कुंभारी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
अष्टविनायकांच्या विविध रूपांची आकर्षक मांडणी, सजावट आणि प्रकाशयोजनेमुळे हा देखावा भाविकांसाठी विशेष ठरत आहे. एकाच ठिकाणी अष्टविनायकांचे दर्शन घेता येत असल्याने पंचक्रोशीतील गणेशभक्तांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.