
गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांची एफआरपी थकीत असल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवारी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनकर्त्यां संघटनांसह गोकुळ साखर कारखाना व्यवस्थापनालाही नोटीस बजावली आहे.(फोटो सौजन्य – AI)
तसेच थकीत रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याचे कडक निर्देश कारखाना व्यवस्थापनाला दिले आहेत. गोकुळ साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची २ कोटी ५० लाख रुपयांची एफआरपी अद्याप अदा केलेली नाही. या थकीत बिलाच्या वसुलीसाठी धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतील ‘ऊस पुरवठा शेतकरी संघटना’ आणि ‘गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समिती’ आक्रमक झाली आहे. थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी सोमवारपासून पूनम गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार जमदाडे यांनी आंदोलनकर्त्या संघटना आणि कारखाना व्यवस्थापनाला नोटीस बजावली.
गोकुळ साखर कारखान्याच्या यंत्रसामग्रीचे वसंतदादा शुगर इन्स्टट्यूट, पुणे यांच्याकडून मूल्यांकन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी तहसीलदार जमदाडे यांनी गोकुळ शुगरच्या जनरल मॅनेजरला २ कोटी ५० लाख रुपयांची थकीत रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत एफआरपीसाठी शेतकरी संघटनांनी सोमवारपासून पूनम गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रशासनाच्या आवाहनानंतरही आंदोलन करण्यात आले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आंदोलकांसह कारखाना प्रशासनाची राहील. तसेच वयोवृद्ध आणि महिला शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून या आंदोलनापासून परावृत्त होण्याचे आवाहन करण्यात आले.