
‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई येथील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकाचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.
Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या काळात जग अनेक स्तरांवर विखुरलेले असून जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्कृती ,मते आणि विचारधारा भिन्न असल्या तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज वाढविणे शक्य आहे.
केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी मानवी मूल्यांवर आधारित संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या अनुभवांतून शिकण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत हा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेत आहे. संपूर्ण विश्व एक असून संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारतीय जीवनदृष्टी आहे. भारताने आपल्या इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
भारताचा जागतिक व्यापारातील ऐतिहासिक सहभाग महत्त्वपूर्ण राहिला असून व्यापाराबरोबरच भारतीय विचारांचा आणि जीवनमूल्यांचा विविध देशांवर प्रभाव पडलेला आहे. बौद्ध धर्म हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. भारतातून अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत पोहोचलेल्या या विचारधारेने मोठा प्रभाव निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा विचारांचा प्रसार युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.