राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेचा मार्ग बदला! सोनाईत बाधित शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनाई परिसरात प्रस्तावित राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बागायती जमीन संपादित होणार असल्याच्या निषेधार्थ परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १३) सोनई बसस्थानकाजवळील Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू केले. यासंदर्भातील हरकती शेतकऱ्यांनी सामूहिकपणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडेही दाखल केल्या आहेत.
केंद्र सरकारकडून धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान २१.८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतची अधिसूचना दि. ५ रोजी Indian Railways च्या Central Railway विभागाने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
या अधिसूचनेनुसार नेवासा तालुक्यातील सोनई आणि शनिशिंगणापूर परिसरातील सुमारे ४३.४६९ हेक्टर बागायती जमीन भूसंपादनासाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोनई परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा भाग बागायती पट्टा असून येथे मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जमीन गेल्यास अनेक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिसरातील अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. भूसंपादन प्रक्रियेत सरकारकडून निश्चित दराने मोबदला दिला जातो. मात्र सध्या बाजारात जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सरकारी दरात मिळणारा मोबदला अपुरा ठरेल, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंदच ठेवा! पावसाचे भयानक रौद्ररूप; कोल्हापुरात फुटल्या काचा
बाधित शेतकरी अनिल निमसे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात रेल्वेमार्ग बागायती क्षेत्रातून न नेता जिरायत भागातून वळवावा, अशी मागणी केली आहे. या उपोषणाला भारत दरंदले, पोपटराव शेटे, संतोष कुंभकर्ण, डॉ. शुभम गडाख, विजय निमसे, सचिन निमसे, ऋषिकेश कल्हापुरे, संतोष कल्हापुरे आदी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, १३ मार्च रोजी सोनई येथे झालेल्या या साखळी उपोषणाकडे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा स्थानिक नेत्यांनी लक्ष दिले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या आंदोलनातून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये राजकीय उदासीनतेबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.






