सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडीची कारणे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. वाहतूक नियमन करताना ज्या चौकांत किंवा रस्त्यांवर खड्डे आढळतील, त्याची माहिती महापालिकेला देऊन ते बुजवून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहेत, असा दावा पोलिसांचा आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो तसेच वाहनचालकांना अचानक ब्रेक लावणे किंवा मार्ग बदलणे भाग पडते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची, चौकाची पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे खड्डे निदर्शनास आणावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी ह्या खड्ड्यांची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेला द्यावी. नंतर महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हे खड्डे तातडीने बुजवून घेण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडी निर्माण करणाऱ्या मूलभूत कारणांवरही उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. खड्डे नसल्याचा दावा महापालिका करत आहे. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांची माहिती महापालिकेला देण्यात येणार आहे.
‘कोंडी कुठे आणि का?’ यावर भर
पुणे शहरातील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पोलिस आयुक्तांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला आहे. कोणत्या चौकात कोणत्या कारणामुळे कोंडी होते, याची माहिती नकाशाच्या माध्यमातून मांडण्यात आली. वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेशी समन्वय
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अनेकदा महापालिका आणि पोलिसांकडून वेगवेगळे निरीक्षण समोर येते. मात्र, प्रत्यक्ष वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे, याची माहिती अधिक अचूकपणे मिळू शकते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा ठिकाणांची माहिती महापालिकेला देऊन त्यावर कार्यवाही करून घेण्यासाठी समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.