मुंबई: मुंबईतील गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा इतिहासात पहिल्यांदाच मोठा विलंब झाला आहे. रविवारी रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नाही. मात्र, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली असून, आता तो विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे.
हा अभूतपूर्व विलंब झाल्यामुळे कोट्यवधी भाविकांच्या मनात उत्सुकता होती. मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.”
सुधीर साळवी यांनी रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी पुढे सांगितले की, “लालबागचा राजा करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे आम्ही सर्व भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो.” या विलंबामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल साळवी यांनी त्यांचे आभार मानले. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखेर, अथक परिश्रमांनंतर राजाचा निरोप समारंभ पूर्ण होत असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सकाळी 8 वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.
शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दोन मुलांना धडक दिली. दोघेही गंभीररित्या चिरडले गेले. या अपघातात एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या ११ वर्षांच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.