टिळक रस्त्यावर डीजे गाण्यांवर थिरकली तरुणाई
पुणे : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीने टिळक रस्ता उत्साहाने आणि भक्तीमय वातावरणाने भरून गेला. दुपारपर्यंत शांत असणारा टिळक रोड दुपारनंतर गर्दीने अक्षरशः फुलून गेला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजराने रस्ते दुमदुमले. ढोल-ताशांच्या गजरासोबत डीजेच्या गाण्यांवर तरुणाई ठेका धरत होती. संपूर्ण परिसरात उत्साह, श्रद्धा आणि जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
मिरवणुकीसाठी सजवलेले रथ हे विशेष आकर्षण ठरले. विद्युत रोषणाईने उजळलेले रथ आणि विविधरंगी फुलांच्या सजावटीने नटलेले गणेश रथ पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. काही रथांनी पारंपरिक देखाव्यांमुळे प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषत: छोट्या मुलांसाठी आकर्षण ठरलेल्या रंगीबेरंगी लाइट्सनी रस्त्यावर दिवाळीप्रमाणे प्रकाशमान वातावरण निर्माण केले. नेहरू तरुण मंडळाच्या महोत्कट गणेश मूर्तीचा रथ आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला होता.
गणनाद, गरवारे, रेणुका स्वरूप अशा ढोल पथकांच्या ठेक्यावर भाविकांनीही ताल धरला. रेणुका स्वरूप पथकात पूर्णतः महिलांचा सहभाग होता. ढोलासोबतच टिपऱ्याचे प्रात्यक्षिकही सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. संपूर्ण टिळक रस्ता ‘भक्ती आणि उत्सव’ यांचा सुंदर संगम बनला होता. या रस्त्यावरून एकूण २०८ गणेश मंडळाच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. मिरवणुकीत शनिवारी दांडेकर पूल येथील आझाद मित्र मंडळाचा पहिला गणपती ग्राहक पेठ चौकातून १.१० वाजता मार्गस्थ झाला.
त्यानंतर थेट ३.४० वाजता नवी पेठेतील हत्ती गणपती मंडळाचा गणपती, त्यानंतर ग्राहक पेठ सेवक गणेश मंडळ, श्री राणा प्रताप मंडळ, बालशिवाजी मित्र मंडळ, श्रीमंत यशवंत नगर मित्र मंडळ, नेहरू तरुण मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, चिमण्या गणपती मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, साई मित्र मंडळ अशी काही मोजकीच मंडळे रात्री बारा वाजेपर्यंत ग्राहक पेठ चौकातून पुढे गेली. त्यामुळे पाठीमागील मंडळाच्या कार्यकर्त्यांना रात्री बारानंतर डीजेच्या दणदणाटावर ठेका धरण्याची संधी मिळाली नाही.
डीजेचा दणदणाट
डीजेच्या उंच भिंतींनी तरुणाईला भुरळ घातली. तरुणांनी डीजेच्या तालावर आणि विविध मराठी, हिंदी, पंजाबी अशा गाण्यांवर नृत्य करत मिरवणुकीची रंगत वाढवली. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नाचत आणि वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला.