सौजन्य : iStock
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दुपारी नागपूरकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. फेब्रुवारीमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने उन्हाळ्यातील एप्रिल, मेमध्ये काय स्थिती असेल, याचा अंदाज लावत नागपूरकरांना अक्षरश: ‘घाम फुटला’ आहे. गेल्या आठवड्याभरापासून कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ झाली असून, सकाळपासूनच ऊन वाढत आहे. दुपारी अक्षरशः घाम निघत आहे.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यावर , 65 हजार लोक येणार; मुंडे बंधू-भगिनी उपस्थित राहणार का? सुरेश धस म्हणाले…
गेल्या आठवड्याभरापासून दुपारी ऊन वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानात 2.6 अंशाने वाढ झाली असून, किमान तापमानात 4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. शहरातून थंडी हद्दपार झाली असून नागरिकांना घरांमध्ये पंखे पूर्ण गतीने सुरू करावे लागत आहे. दुपारच्या वेळी आता नागपूरकरांना मफरलऐवजी दुपट्टा, स्कार्फ घालून निघावे लागत आहे.
हाताला उन्हाचे चटके लागत असल्याने मुली सनकोट घालून दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज शहरात कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस होते.
पुण्यातही होतीये तापमानात वाढ
हवामान विभागाने देखील अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, मंगळवारी (दि.४) पुण्यात उन्हाचा पारा चढलेला असणार आहे. पुण्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. तर रात्रीचे किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आज पुणेकरांना दिवसभर उन्हाच्या झळा जाणवतील तर रात्री थंडी जाणवू शकते, असादेखील अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
साताऱ्यात तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज
हवामान विभागानुसार, साताऱ्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दिवसभर उष्णता असेल. येथील किमान तापमान १५ अंश सेल्सिअस पर्यंत घटू शकते. तर सोलापूर शहरामध्ये उष्णतेचा प्रभाव तीव्र असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रात्रीचे किमान तापमान मात्र १८ अंश सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते. सोलापूरमधील नागरिकांना उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जात आहे.