पुणे : खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यंदा महसूलच्या पुणे विभागातून मागणी केलेल्या एक लाख ६८ हजार ९५० क्विटंल बियाण्यांपैकी ४९ हजार ४२७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. गावपातळीवर कृषी सेवा केंद्राकडून हे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, असे महसूलच्या पुणे विभागाच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने गेल्या एक ते दीड महिन्यापासून खरिपाची तयारी सुरू केली आहे. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात खरिपाचे सरासरी १३ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १३ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख ६८ हजार ९५० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. त्यास कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
सध्या विभागातील बहुतांशी भागात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मे च्या पहिल्या आठवड्यापासून पूर्व मशागतीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. नांगरटी करण्यावर भर देत शेत पेरणीसाठी तयार केली आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी करता येईल. शेतकऱ्यांना खतांच्या व बियाण्यांच्या बाबतीत काही अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने १५ हजार ९९७ क्विंटलने अधिक वाढ करीत जवळपास एक लाख ६८ हजार ९५० क्विंटल बियाण्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये महाबीज एनएससीकडून २२ हजार २५४ क्विंटल, तर उर्वरित खासगी कंपन्यांकडून बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.
[read_also content=”करण जोहरची पार्टी भोवली; सुपरस्टार शाहरुख खानलाही कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/maharashtra/karan-johars-party-revolves-around-superstar-shah-rukh-khan-also-contracted-corona-nrdm-289094.html”]
जिल्हानिहाय बियाण्यांची मागणी, झालेला पुरवठा (क्विंटलमध्ये)
जिल्हा…मागणी…झालेला पुरवठा
कोल्हापूर — ३९,९७१ — ८७९५
सांगली —३८१४० —७२९४
सातारा —४४१७२ — ६५६३
पुणे —२९५६७ —१६७२५
सोलापूर —१७१०० —१००५०
एकूण —१,६८,९५० —४९,४२७