
दादा बिझी, गुलाबी गाडी, गुलाबी जॅकेट, ओ गुलाबो... म्हणत सुषमा अंधारेंनी अजित पवारांना डिवचले
अहमदनगर: राज्यात लाडकी बहिणी योजनेवरुन चांगलेच घमासान सुरू आहे. लाडकी बहिण योजनेचा प्रचार करण्यासाठी सत्ताधारी पक्ष राज्यभर दौरे करत आहेत. मात्र याच योजनेवरून विरोधकांनी रान उठवलं आहे. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी करोडो रुपयांचा खर्च होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर आता या योजनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील महायुतीवर टीका केली आहे. यावेळी अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.
हेदेखील वाचा- अनेक वर्षापासून नादुरुस्त गटाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून केलं! नागरीकांनी मानले आभार
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज पारनेरमध्ये महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार देणाऱ्यांना लाडकी बहीण काय समजणार? 19 तारखेला पुण्यात जीएसटी भवनाचे उद्घाटन होते. त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या उद्घाटन समारंभासाठी मंडप व इतर तयारीसाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. पण दादा बिझी.. गुलाबी साडी.. गुलाबी गाडी.. गुलाबी जॅकेट.. गुलाबी झेंडा.. गुलाबो..ओ गुलाबो.. दादांचे इतके गुलाबी गुलाबी वातावरण की दादांना जीएसटी भवनाकडे जायला वेळच मिळाला नाही. दादा गेलेच नाही, उद्घाटन झालेच नाही. 50 लाखांचा मांडव आज काढायला सुरुवात झाली. हे 50 लाख रुपये कोणाच्या खिशातून गेले?
हेदेखील वाचा- डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा कोलमडली; अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
यावेळी सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील पेपर फुटीवर तसेच सरकारी भरती व खाजगी कंपन्यांचे स्थलांतर यावर देखील भाष्य करत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले असून सरकारी नोकरीतील भरात्यांमध्ये देखील मोठा घोळ सुरू आहे. खाजगी नोकऱ्यांसाठी कंपन्याच गुजरातला जात आहेत. महाराष्ट्राच्या पदरी केवळ निराशाच पडत आहेत. येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा अशी अवस्था सध्या महाराष्ट्राची झाली आहे, अशा शब्दात अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली आहे.
लाडकी बहीण योजनेवरून देखील सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातून पैसे दिलेले नाही, ते पैसे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचेच आहे. मिळालेले पैसे हे तुमच्याच भावाचे तुमच्या घरच्यांचे आहे. एकीकडे आपण योजनांवरती खर्च करत आहात, मात्र दुसरीकडे नोकऱ्यां नाहीत, त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार देणारे स्वतःच लाडकी बहीण योजना जाहीर करतात.
फडणवीस यांनी एवढा अभ्यास केला की त्यांची पदोन्नती व्हायचं तर डिमोशन झालं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा उपमुख्यमंत्री झाला. वन नेशन वन इलेक्शन केवळ म्हणत आहेत, मात्र ते घाबरलेले आहेत. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर पडलेल्या आहेत. यामुळे राज्यातल्या निवडणुका देखील पुढे ढकलण्याचा यांचा डाव आहे. लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून राजकीय पेरणी करू आणि नंतर विधानसभा निवडणुका घेऊ असं त्यांचा डाव आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.