मुंबई – ठाकरे गटाची धडाडती तोफ आणि गेल्या काही दिवसांत शिंदे गटाच्या रडारवर आलेल्या सुषमा अंधारेंना शह देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश झाला. टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. ही खेळी शिंदे गटाकडून सुषमा अंधारे यांना निष्क्रीय करण्यासाठी खेळली जात असल्याचे म्हणण्यात येत आहे. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असल्याचे म्हणण्यात येत आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी ३ ते ४ महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेला यावेळी आपली गरज असल्याचे म्हणत त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले होते. मात्र त्यानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अधिकच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. शिंदेसह अनेकांवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाही. अनेकदा शिंदेvsअंधारे असा सामना रंगला आहे.






