Suspension of three policemen
पुणे : शहर पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या या धडक कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन तसेच हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेला मारहाण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयातून आरोपी पलायन प्रकरण
ससून रुग्णालयातून आरोपीच्या पलायन प्रकरणात पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर, पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे यांना निलंबित केले आहे. गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती यांना धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लीलाकर ( रा. आकुर्डी) याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. मार्शलने सोशल मीडियातून धमकी दिली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलिसांना गुंगारा देऊन पसार
फरासखाना- विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) मार्शलला ठेवले होते. त्याने मध्यरात्री छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पासलकर आणि खाडे त्याला घेऊन ससून रुग्णालयात गेले. मात्र, बाह्य रुग्ण उपचार कक्षात मार्शलची तपासणी सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणाच्या चौकशीत दोघे कर्तव्यात कसुरी केल्याचे आढळून आल्याने दोघांना निलंबित केले आहे.
मगरपट्टा सिटी पोलीस चौकीत चोरीच्या संशयातून
हडपसर पोलीस ठाणे अंकित असणार्या मगरपट्टा सिटी पोलीस चौकीत चोरीच्या संशयातून एका मोलकरीण असलेल्या महिलेला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, तिला बेदम मारहाण केली. चारतास तिथेच बसवून ठेवत तिने पाणी पिण्यास मागितले असता तिला लघवी पी असे म्हणत अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. याप्रकरणाची दखल घेत वरिष्ठांनी सहाय्यक निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलीस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबीत केले आहे. तर, अदखलपात्र गुन्हयाची देखील नोंद केली आहे. दरम्यान, त्यांची खातेनिहाय्य चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले आहे.