
Sangli News : TET सक्तीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा
सांगली : शिक्षकांना केलेली टीईटीची सक्ती रद्द करण्यासाठी राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पुढील शुक्रवारी (दि.5) सामूहिक रजेवर जात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघटना शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार बैठकीत दिली.
येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला सर्व खाजगी, शासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील म्हणाले, शिक्षकांना टीईटी सक्ती केली आहे. याबरोबर संच मान्यता, कमी पटाच्या शाळा बंद करणे हे धोरण शिक्षकांविरोधी आहे. या विरोधात वारंवार आवाज उठवला तरी शासनाकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन शुक्रवारी (दि.५) सामूहिक रजेवर जाणार आहे. शाळा बंद ठेवून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : महा TET परीक्षा झाली सुरळीत! ‘या’ दोन केंद्रावर आठ उमेदवारांची हकालपट्टी, पारदर्शकतेवर भर
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने टीईटी सक्ती विरोधात याचिका दाखल करणे आवश्यक आहे.
समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील म्हणाले, २०१३ पूर्वी शिक्षक सेवेत आलेले सर्व शिक्षक पात्रता सिध्द करूनच सेवेत आले आहेत, त्यांना पुन्हा टीईटी परिक्षा द्यायला लावणे योग्य नाही. अमोल माने म्हणाले, हा निर्णय लादणे चुकीचे असुन यामुळे ८० टक्के शिक्षक सेवेतुन बाद होतील. अनेक शाळा बंद पडतील. उर्दूचे मुश्ताक पटेल यांनी हा निर्णय अन्यायकारक असून शासनाने याबाबत न्यायालयात ठोस भूमिका मांडत हे संकट दूर करावे, अशी मागणी केली. तर अमोल शिंदे यांनी या मोर्चात पालक, विद्यार्थी व शिक्षकप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी राजेंद्र नागरगोजे, अविनाश गुरव, जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, धैर्यशील पाटील, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अमोल माने, अरविंद जैनापुरे, अरविंद गावडे, सुधाकर माने, बापू दाभाडे, संजय झांबरे, उत्तम इंगळे, स्वप्निल मंडले, नामदेव पाटील, सचिन इंगोले, टी. के. जावीर, एस. टी. नाईक, नेताजी भोसले आदी उपस्थित होते.
हेदेखील वाचा : 2027 पर्यंत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक! राज्यभरातील शिक्षकांची धाकधूक वाढली, आज परीक्षेचा दिवस