वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता (File Photo : Temperature)
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भीषण उष्णता जाणवत असून, बुधवारीही अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. 44 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानची अकोल्यात नोंद झाली होती. अवघ्या दोन दिवसांतच पुन्हा राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. भुसावळच्या तापमानाचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे पाहिला मिळाले.
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही कमालीचा उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात तापमानाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू झाली असून, भुसावळ तालुक्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर जाऊन पोहचल्याचे चित्र आहे.
जालन्यातील बाजारपेठेत शुकशुकाट
विदर्भानंतर मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट आली असून, जालना जिल्ह्यात तापमान 42 अंशांवर गेले आहे. तर मागील दोन दिवस तापमान 41 अंशांवर होते. जालन्यात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
बुलढाण्यात पानवठे आटले
उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढीमुळे बुलढाण्यातील दाट जंगलातील पानवठे आटले आहेत आणि त्यामुळे दाट जंगलातील हिंस्र प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबारवा अभयारण्यातील हिंस्त्र प्राणी आता पर्यटकांना ही सहज दिसू लागले आहेत. आंबा बरवा अभयारण्यात सध्या 18 वाघ असून अस्वल, रानगवे हे सुद्धा सहज आता दिसायला लागले आहेत.
जनजीवन पूर्णतः विस्कळीत
उन्हाचा पारा लक्षात घेता जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा पाच ते सहा अंशांनी वाढून तापमान 45 अंशांवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. वाढलेल्या या तापमानात अनेक नागरिकांनी घराच्या बाहेर जाणे टाळले आहे. तर ज्यांना कामानिमित्ताने बाहेर जाणे आवश्यक आहे, अशा नागरिकांनी शीतपेय घेण्यासह, अंगभर सुती कपडे वापरून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.