नाशिक : राज्यातील विरोधकांवर वाढत्या ईडीच्या कारवाईमुळे (ED Actions) आक्रमक भूमिका मांडली जात आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh), संजय राऊत (Sanjay Raut), राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यानंतर आता रोहित पवार(Rohit Pawar) हे ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे. ‘ईडी हा NDA चा महत्वाचा घटक दल झालेला आहे’, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
ईडीच्या कारवाईवरुन बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सरकार विरोधात जे बोलत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आज राजकारण्यांवर ही वेळ आली आहे. 2024 ला हेच सरकार आले तर पत्रकारांना देखील हैराण केले जाईल. सध्या आपला देशात न्याय आहे का नाही. पाकिस्तान मधील हुकूमशाही आपल्या देशात आली आहे का” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुढे सूरज चव्हाण प्रकरणाचे उदाहरण देत आदित्य ठाकरे म्हणाले, “सूरज चव्हाण केस मध्ये देखील मालकाला सोडून कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सूरज चव्हाण प्रकरणात कंपनीचा मालक मिंधे गटात गेले म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूरज चव्हाण त्या कंपनीत फक्त कर्मचारी आहेत. किशोरी पेडणेकर, राजन साळवी, अमोल किर्तीकर, वायकर यांच्यावर देखील कारवाई सुरू आहे. भाजपात किंवा मिंधे गटात या नाहीतर कारवाई करू अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती फक्त आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण देशात आहे,” अशा शब्दांत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप विरोधात आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र डागलं आहे.