
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय प्रशासनाने अंमलात आणलेली कठोर शिस्त आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे. रुग्णालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू, बीडी, सिगारेट आणि अगदी दारूचे सेवन करणाऱ्यांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेटवर आणि परिसरात नियमित गस्त घालताना अनेकांना नशेचे पदार्थ वापरताना रंगेहाथ पकडण्यात आले असून काहींनी औषधांच्या पाकिटांत दारू लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रशासनाने आता आणखी कडक पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या आदेशानुसार, परिसरात कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ बाळगणे, सेवन करणे किंवा आतमध्ये आणणे यावर संपूर्ण बंदी आहे. तरी देखील काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
काळ आला पण वेळ नाही; उड्डाणपुलाचा भाग कोसळला अन्… मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
काही जणांनी गुटखा किंवा तंबाखू तोंडात लपवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी दारूच्या बाटल्या औषधांच्या पाकिटांत ठेवून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार वेळीच थांबवण्यात आले. गेटवर आणि परिसरात २४ तास गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी गेल्या काही दिवसांत अनेक अशा घटनांचा पर्दाफाश केला आहे. काहींना ताबडतोब इशारा देऊन सोडण्यात आले तर काहीं विरुद्ध प्रशासकीय अहवाल तयार करून दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रुग्णालय परिसरात शिस्त आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये या मोहिमेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे.
या कारवाईमुळे रुग्णालय परिसरात केवळ शिस्तच नव्हे, तर आरोग्यदायी आणि स्वच्छ वातावरण तयार झाले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्येही “रुग्णालय म्हणजे आरोग्याचे मंदिर” ही भावना दृढ होत आहे. रुग्णालय प्रशासनाने पुढेही ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, समाजात नशामुक्तीचा ठोस संदेश देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले की, “रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने हे लक्षात ठेवावे की येथे येणारा प्रत्येक व्यक्ती उपचारासाठी किंवा सेवेसाठी येतो, नशा करण्यासाठी नाही. रुग्णालय परिसरात कोणत्याही प्रकारचा नशा किंवा त्याचे पदार्थ आढळल्यास थेट पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल”.