
मिरा-भाईंदरमध्ये गोमांस विक्री करणाऱ्यांवर कूरेशी समाजाचा बहिष्कार
पहिल्यांदाच मिरा-भाईंदर शहरात कूरेशी समाजाने एकत्र येत कायद्याचे पालन, सामाजिक सलोखा आणि कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत समाजातील प्रतिनिधींनी मांस विक्री करणाऱ्या दुकानांना भेटी देत संबंधित दुकानदारांशी संवाद साधला. अनधिकृत गोमास विक्रीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच समाजात गैरसमज निर्माण होणार नाहीत, यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला.
या सामाजिक निर्णयाचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी कूरेशी समाजाला भेट देत त्यांच्या पुढाकाराचे अभिनंदन केले. यावेळी कूरेशी समाजाच्या वतीने प्रताप सरनाईक यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह म्हणून गाय व गायीचे वासरू देण्यात आले. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला ‘राजमाता’चा दर्जा दिला होता, त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची सुरुवात मीरा-भाईंदर शहरापासून व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदर हे बदलते शहर आहे. प्रत्येक समाजाने शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी पुढाकार घेणे ही फार मोठी गोष्ट आहे. दोन्ही समाजांनी असाच समजूतदारपणा दाखवला, तर बाहेरून कितीही भडकाऊ भाषणे झाली तरी त्याचा शहरावर परिणाम होणार नाही.”
कूरेशी समाजाच्या या निर्णयामुळे मिरा-भाईंदर शहरात सामाजिक सलोखा आणि शांतता जपण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची चर्चा होत आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.