शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गीर गाईंचे वितरण रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) पार पडले. हा उपक्रम म्हणजे केवळ मदत नाही, तर संकटात कोसळलेल्या शेतकरी कुटुंबांना पुन्हा उभे करण्याचा निर्धार ठरला आहे.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले. शेतीबरोबरच कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे गमावल्यामुळे त्यांचे जीवनचक्रच थांबले. ही व्यथा स्थानिक पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोहोचवताच, क्षणाचाही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरातून उत्तम प्रतीच्या देशी गाईंचा शोध घेतल्यानंतर गुजरातमधील गीर प्रजातीची गाय शेतकऱ्यांसाठी निवडली. प्रत्येकी सुमारे ७५ ते ८० हजार रुपये किंमतीच्या या गाई महाराष्ट्रातील स्थानिक गाईंपेक्षा दुप्पट दूध देतात.
सध्या देशी दुधाला चांगला दर मिळत असल्याने, या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार प्राप्त होईल. विशेषतः कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका अधिक बसल्याने, या भागातील पशुधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हे गाईंचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम म्हणजे केवळ जनावरांचे वाटप नाही, तर संकटाच्या काळातही शासन आणि लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याची साक्ष देणारी मायेची हमी आहे. दूधाळ गाईंसोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नव्या आशेचे दूध पुन्हा वाहू लागले आहे.






