
Ravindra chavan
Dombivli News : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री वरदगणेशाची महाआरती भक्तीमय वातावरणात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते यावेळी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आणि सुदृढ दीर्घायुष्यासाठी तसेच विकसित भारताच्या संकल्पासाठी असंख्य डोंबिवलीकरांनी श्री वरदगणेशाच्या चरणी सामूहिकरीत्या प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, “हा ‘आशीर्वादाचा दिवा’ मोदीजींच्या सेवाव्रताचा आणि विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे.” तसेच नागरिकांनीही आपल्या घरी किंवा परिसरात ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून नरेंद्र मोदी यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामदैवताच्या महाआरतीनंतर उपस्थित नागरिकांनी मोदींच्या दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रार्थना केली. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक संदर्भाचीही जोड मिळाल्याचे यावेळी दिसून आले.
विजयी भव सर्वत्र सर्वदा।
जगति भवतु तव सुयशोगानम्। भारतमाता आणि भारतीयांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज ७६वा वाढदिवस ! आपल्या सनातन परंपरेत वाढदिवस दीप प्रज्वलित करून, प्रार्थना आणि शुभाशीर्वादाने साजरा करण्याची पवित्र… pic.twitter.com/Y2xeEifssU — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) September 17, 2026
या कार्यक्रमाला भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक समीर चिटणीस, नगरसेविका ज्योती पाटील, मंदा पाटील, रंजना पेणकर, मृदुला नाख्ये, तसेच भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अनमोल म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला. श्री वरदगणेशाच्या चरणी प्रार्थना आणि ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलनाने कार्यक्रमाची सांगता झाली.