
फोटो सौजन्य- gemini
गणेशोत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदाही मोठ्या प्रमाणावर मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभेतून यंदा तब्बल ११०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे रवाना होणार असून, सुमारे ४५ ते ५० हजार गणेशभक्तांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. गुरुवारपासून कल्याण-शीळ रोडवरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप येथे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. डोंबिवली, कल्याण पूर्व, दिवा यासह अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा परिसरातून बसेस रवाना होणार आहेत. यामध्ये डोंबिवलीतून सुमारे ३५०, कल्याण पूर्वेतून २१०, तर दिव्यातून १५० हून अधिक बसेस जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डोंबिवली आणि दिवा परिसरासाठीच्या सुमारे ५०० बसेस गुरुवारी दुपारपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील एसटी आगारांतून कल्याण-शीळ रोडवरील सामंत पेट्रोल पंपासमोरील परिसरात दाखल होणार आहेत. त्यानंतर या बसेस प्रीमियर कंपनी मैदान, संदप, दिवा रोड येथे आणण्यात येतील. गणेशभक्तांनी केलेल्या नोंदीनुसार संबंधित भागांमध्ये या बसेस पाठविण्यात येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या बसेस कोकणातील रायगड, खेड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराडच्या दिशेने रवाना होतील.
गणेशभक्तांच्या वाढत्या मागणीनुसार यावर्षी कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूर या भागांसाठीही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना आणि महिला सेनेचे कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून नियोजन आणि व्यवस्थापनाच्या कामात कार्यरत आहेत.
गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना आणि महिला सेनेचे कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून नियोजन व व्यवस्थापनाच्या कामात कार्यरत आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, बसचे नियोजन आणि गणेशभक्तांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणासह विविध जिल्ह्यांमध्ये जातात. अशा भाविकांसाठी ही मोफत एसटी बससेवा मोठी दिलासा देणारी ठरणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)