
Diva Rohidas Munde
Thane News : दिवा शहरातील आरओबी (रेल्वे उड्डाणपूल) प्रकल्पाच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून अन्याय सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवाळीच्या तोंडावर दिवा आरओबी प्रकल्पासाठी काही इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीच्या तोंडावर करण्यात आली. आरओबीच्या बाजूला असलेल्या इमारतीवर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवून इमारत जमीनदोस्त केली. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली असून, त्यांच्या कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.
विशेष म्हणजे, दिवा आरओबी प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या पांडुरंग हरी भोईर व इतर शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार आहे. मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित असताना संबंधित शेतकऱ्यांकडून आरओबी प्रकल्पाला विरोध होत आहे. मात्र, या प्रश्नावर चर्चा करून न्याय देण्याऐवजी प्रशासनाकडून थेट तोडक कारवाई केली जात असल्याचा आरोप ॲड. मुंडे यांनी केला आहे.
या प्रकल्पामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या इमारती आणि मालमत्तादेखील बाधित होत असल्याची चर्चा असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही? सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारतींवरच महापालिकेचा हातोडा का चालतो? कायदा केवळ गरीब आणि सामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून प्रशासन काय करत होते? प्रकल्पाच्या नियोजनाच्या वेळीच बाधित नागरिकांचे पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न का सोडवला नाही? दिवाळीच्या तोंडावरच नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची प्रशासनाला अचानक आठवण का होते? या संपूर्ण प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून, या कारवाईमागील निर्णयप्रक्रियेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिवा शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात दिवा शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक स्तरातूनही निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, या गंभीर विषयावर सत्ताधारी शिंदे गटाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांना बेघर करणे म्हणजे विकास नव्हे! आरओबी आम्हालाही हवा आहे; मात्र शेतकऱ्यांना मोबदला न देता, नागरिकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था न करता आणि राजकीय नेत्यांच्या मालमत्तांकडे दुर्लक्ष करून केवळ सामान्य माणसाच्या घरांवर हातोडा चालवणे आम्ही कदापि सहन करणार नाही. विकास सर्वांचा झाला पाहिजे, विनाश केवळ गरीब शेतकऱ्यांचाच का? या अन्यायाविरोधात आम्ही नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत,” असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी दिला आहे.
Ans: दिवा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) प्रकल्पाच्या कामासाठी 5 नोव्हेंबर 2026 रोजी एका इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
Ans: बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि इमारतीतील रहिवाशांना पुनर्वसनाची व्यवस्था न करता कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Ans: आरओबी प्रकल्पातील बाधित नागरिकांना न्याय मिळावा, मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा तसेच तोडक कारवाईच्या निर्णयप्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.