आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गोग्रासवाडी परिसरात अनेक वर्षांपासून एक अनधिकृत गोठा सुरू आहे. या गोठ्यामध्ये स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून साचलेल्या शेणामुळे येथे मोठ्या प्रमाणात दलदल तयार झाली आहे. या परिस्थितीचा त्रास परिसरातील नागरिकांना सातत्याने सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या गोठ्याच्या आसपासच प्राचीन कृष्ण मंदिर, पंचमुखी व दक्षिणमुखी मारुती मंदिर, मोठे जैन मंदिर आणि प्रकाश विद्यालय आहे. त्यामुळे या परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि दलदल असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या गोठ्यातील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जाते. गेल्या वर्षी शाळकरी मुलगी दलदलीत अडकल्यानंतरही अशाच प्रकारची तात्पुरती कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली.
या गोठ्यातील अनेक गायी सकाळच्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून मंदिर परिसरात आणल्या जातात. तेथे गोमातेचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक गाईंना चारा खाऊ घालतात. त्यानंतर दुपारनंतर या गायी पुन्हा गोठ्यात आणल्या जातात. या व्यवहारातून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या गायींची देखभाल आणि स्वच्छतेबाबत मात्र कोणतीही योग्य व्यवस्था दिसून येत नाही.
गायी पाळण्याला, वासरे ठेवण्याला किंवा गोशाळा चालवण्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, त्यासाठी आवश्यक स्वच्छता, आरोग्यविषयक नियम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गोमातेच्या सेवेमागे नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पायमल्ली होणे कदापि योग्य नाही.
सध्या पितृपक्ष सुरू असून हिंदू धर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने आपल्या पितरांच्या स्मरणार्थ गाईंना चारा खाऊ घालण्यासाठी या परिसरात येत आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या दलदलीचा अंदाज न आल्यामुळे भाविकांनाही धोका निर्माण होत आहे. पुन्हा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
१. वारंवार तक्रारी करूनही या अनधिकृत गोठ्यावर कायमस्वरूपी कारवाई का केली जात नाही?
२. गेल्या वर्षी एका शाळकरी मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला, तरीही प्रशासनाने ठोस पावले का उचलली नाहीत?
३. आता पुन्हा एक व्यक्ती दलदलीत अडकण्याची घटना घडल्यानंतरही प्रशासन आणखी किती काळ निष्क्रिय राहणार?
४. या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
५. या अनधिकृत गोठ्यातील जनावरांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून परिसर स्वच्छ करण्याची कारवाई कधी होणार?
विशेष म्हणजे, गोग्रासवाडी गोशाळेचा स्वतःच्या मालकीचा अधिकृत गोठा असून तेथे जनावरांची योग्य प्रकारे देखभाल केली जाते. त्या गोठ्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. मग या अनधिकृत गोठ्याबाबतच प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही?
गोग्रासवाडी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वेळ आली आहे.
या अनधिकृत गोठ्यातील जनावरांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, परिसरातील दलदल पूर्णपणे साफ करावी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
गेल्या वर्षी एका शाळकरी मुलीचा जीव धोक्यात आला आणि आता पुन्हा एका व्यक्तीला या दलदलीचा सामना करावा लागला. आणखी एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार आहे का?
हा प्रश्न आज गोग्रासवाडीतील प्रत्येक नागरिक विचारत आहे. या गंभीर समस्येची जबाबदारी निश्चित करून तातडीने कायमस्वरूपी कारवाई करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.






