
kalyan slum removed
Kalyan News : कल्याण पश्चिमेतील सिंदिकेट परिसरातील आतिश खान कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या ७० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसेना शिंदे गट पुढे आला असून, शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी स्थानिक नागरिकांसोबत पत्रकार परिषद घेतली.
यावेळी रहिवाशांनी आपली भूमिका मांडत, आम्हाला विकासाला विरोध नाही; मात्र विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये या जागा संदर्भात न्यायालयीन खटला सुरू असताना निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. असे असतानाही आता रेल्वे प्रशासनाकडून घर खाली करण्याची नोटीस देण्यात आल्याने नागरिकांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पत्रकार परिषदेत रहिवाशांच्या मागण्यांकडे सरकार आणि रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, पर्यायी घरांची उपलब्धता आणि न्यायालयीन प्रकरणातील परिस्थिती स्पष्ट होणे, या मुद्द्यांवर तोडगा निघणे गरजेचे आहे.
गेल्या अनेक दशकांपासून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे आणि बाधित कुटुंबांना पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी रहिवाशांनी सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
आता रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे आतिश खान कंपाऊंडमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुनर्वसनाबाबत स्पष्ट निर्णय होणार का, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा ठरत आहे.